मुंबईत रस्त्यावर नाष्टा सेंटर चालवणाऱ्याकडे गावाकडील भाऊ जमिनीचा हिस्सा मागायला आला अन पुढे.. बघा काय घडले
नमस्कार मित्रांनो..
रस्त्याच्या कडेला तो सकाळी दोन ते अडीच तास उभा राही, पोहे, उपमा, शिरा, सांजा तर कधी इडली, मेंदुवडा घेऊन. एकाच प्रकारची आणि एकाच चवीची चटणी मिळणं ही खासियत होती त्याची. क्वालिटी कंसिस्टन्सी च कोणतंही ट्रेनिंग न घेता गरजेपुरत बोलणं, २-३ डब्बे एका टेबलावर मांडलेले, बाजूला पिशवी त्यात प्लेट आणि एक कचरा गोळा करायला डबा, बस. इतकंच.
नियमित गिऱ्हाईक आणि कधी २-४ नवीन येणारे चेहरे त्यामुळे त्याच्या टेबलाच्या आसापास गर्दी असे. सकाळी ७ ते ९.३०-१० वाजेपर्यंत तो तिथे असे. कधी-कधी त्याआधीच ते डबे रिकामे होत. एक प्लेट खाऊन झाली आणि पैसे द्यायला गेलो की थोडे पोहे किंवा उपमा सहज वाढून जाई. कदाचित ह्या घासभर जास्त मिळणाऱ्या उपमा पोहे यासाठीच गर्दी होत असे. एक वेगळंच समाधान मिळत असे.
छान झालाय शिरा अशी दाद दिली, की तो दात न दाखवता हसे. तो मितभाषी होता, घुम्या नव्हता, हे नक्की. सांडलेल्या, विखुरलेल्या प्लेट, अन्न तो कचऱ्याच्या डब्यात टाके. ती जागा साफ करून तो निघून जाई. “पप्पा आला होता का?” एक जण विचारत होता. येऊन गेला, पंधरा मिनिटांनी परत येणार आहे. त्याचा मोबाईल खराब झाला होता, त्याच उत्तर.
पार्टी ऑर्डर घेणार का, २०० प्लेट? जास्त नाहीये खरंतर. माझ्या मित्राने त्याला विचारलं होतं. नाही घेत मी पार्टी ऑर्डर, मला नाही होणार शक्य, माफ करा. शांतपणे आणि विनम्रपणे आलेला त्याचा नकार त्याला माज आलाय असा आम्हालाही तेव्हाही वाटल नाही. गेली ३-४ वर्षे मी त्याचा बऱ्यापैकी नियमित गिऱ्हाईक. त्याच्याकडून ओळखीची नजर मिळवणाऱ्या पैकी एक. अरे तो पोहेवाला आला नाही का आज?
आम्ही नेहमीच येणारे ३-४ गिऱ्हाईक एकमेकांशी बोलू लागलो होतो. बघा ना, भरवशाच्या म्हशीला टोणगा. मी ६.५० ला येऊन उभा आहे. पण पोहेवाला आला नाही अजून. थोडा वेळ वाट पाहून आम्ही घरी परतलो होतो. दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. हे सुरूच राहिलं होतं. ती जागा रिकामी राहू लागली होती. रोज सकाळी येता जाता त्या रिकाम्या जागेकडे आपसूक माझी नजर जाई.
गरम गरम पोह्याचा, उपम्याचा वास आल्यासारखा वाटे. कुठे गेला असेल पोहेवाला? त्याची घरची माहिती, पत्ता काहीच माहीत नाही. जास्त वर्दळीचा नसलेला रस्ता. तिथे खास त्या नाश्त्यासाठी लोक येत. सकाळच्या वेळी ती जागा भरलेली असे. पण ते बंद झालेलं होतं. काय झालं असेल? कुठे गेला असेल? कोणतही बंध न जुळवता ही आपोआप आपण बंधनात अडकतो की सवयीत?
त्याच नसणं मला स्वीकारावं लागत होतं. त्याच्या नावावर नसलेली पण त्याची मानलेली ती जागा कदाचित तशीच राहणार होती, रिकामी. आणखी काही महिने असेच गेले. एकेदिवशी तिथे एक गाडी लागलेली पहिली. पालिकेचा अधिकृत स्टॉल. माझी उरली सुरली आशाही संपली होती. नकळत माझी पाऊले तिकडे वळली होती. एक मुलगा मुलगी तिकडे स्टॉलवर काम करत होते. नुकतच लग्न झालं असावं असं वाटलं. तुम्हाला नाष्टा हवाय का? तयार आहे. सांजा आणि पोहे आहेत.
त्यातल्या मुलीने विचारलं होतं. पटकन हो बोलून गेलो. हे डब्बे. आमचेच, म्हणजे पोहे काकांचे. तुम्ही नेहमी यायचे का पोहे खायला इथे. आपण? मी मनोज निमकर आणि ही मनिषा, माझी बायको. सदावर्ते दादा, वहिनी आमचे शेजारी. लहानपणासून त्यांना पाहतोय. दादा वहिनी त्यांची तीन मुलं, पाच जण एका घरात. पोहे देता देता तो बोलू लागला होता. दादा सुरक्षा एजन्सीत कामाला तर वहिनी कुठल्याशा घरगुती खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत. मधला मुलगा थोडा वेगळा म्हणजे मंदबुद्धी.
बाकी दोघं हुशार, होतकरू. दादाची सततची नाईट ड्युटी. घरी मुलांसाठी थांबायला कुणी हवं म्हणुन वहिनी पण सगळं सांभाळत असे. लाख शेजार लाभलाय, असं लोक म्हणत. कारण मदतीला सतत तयार असणार हे कुटुंब. बऱ्याच वेळा माझा सकाळचा नाष्टा दादा वहिनी कडेच होई. आमचं लग्न जमवण्याच श्रेय पण त्यांनाच. काही कारणामुळे दादाची नोकरी गेली. त्याच वेळी वहिनीच काम वाढलं. मग नोकरीची खटपट चालू असताना त्यांनी सकाळच्या वेळेत नाष्ट्याची गाडी टाकायचा विचार केला.
सकाळी लवकर उठून नाष्टा बनवून तो इथे घेऊन येई. १० वाजेपर्यंत तो घरी येई. मग वहिनी नोकरीला जाई. २ वर्ष व्यवस्थीत चालल्यानंतर त्याने पालिकेकडे अधिकृत परवान्यासाठी रीतसर अर्ज केला होता. सर्व स्थिरस्थावर होत होतं. पाच-सहा महिन्यापूर्वी माझा चुलता घरी आला होता. गावच्या जमिनीसाठी बोलणी सुरू होती. बोलता बोलता वाद झाला आणि वाढला. कदाचित त्याची तयारी तो करून आला असावा. दोन गावगुंड होते बरोबर. मी आणि बाबा त्याच्याशी बोलत असताना एकाने काठी काढली आणि,
तो बाबांना मा’रणार तेवढ्यात दादा मधे पडला होता. त्याने तो वार अडवला. तेवढयात दुसऱ्याने काठीचा वार केला तो नेमका दादाला वर्मी लागला आणि तो कोसळला. चुलत्याने पळ काढला. मग सदावर्ते, त्याच काय, ठीक आहे ना? आता बरं आहे. २ दिवस बेशुद्ध होता दादा हॉस्पिटल मध्ये. त्याला पॅरेलीसिस झालाय असं डॉ’क्टर म्हणाले होते. सात आठ महिन्यात होईल ठीक हेही सांगितलं. आमच्यातल्या भांडणामुळे त्याला लागल हे घरातल्या एकानेही जाणवू दिलं नाही.
खरंच ग्रेट आहेत हे पाच जण. दादा मनाने कोसळू नये म्हणून वहिनीने २ महिन्यांनी त्याला घरात थोडं काम करायला लावलं. पोहे स्पेशल वेळ लागला पण केलं त्याने. एकदम तीच चव टेस्टी. वहिनी, खरंच शब्द नाही तिच्याबद्दल. हे होत असताना पालिकेकडून परवाना मिळाल्याचं पत्र आलं. मग मी आणि मनिषाने ठरवलं सकाळचे २ तास दादा वहिनीसाठी असे द्यायचे. मदत म्हणून नाही, जाणीव म्हणून.
दादा येईल काही महिन्यांनी तोपर्यंत त्याने बनवलेला नाष्टा तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार. ही रिकामी जागा पूर्ण नाही थोडी तरी भरणार. निदान तसा प्रयत्न तरी करणार. माझ्याकडे शब्द च नव्हते. माझे पोहे खाऊन संपले होते. सौ. मनिषाने आणखी घासभर वाढलेच न सांगता. चविष्ट पोहे आणि एकमेकांना सांभाळणारी माणसं. मन तृप्त झालं होतं. ती रिकामी जागा भरलेली होती आणि मनही.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.